22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यानंतर सर्वसामान्यांना रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश दिला जात आहे. तर रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, नवीन राम मंदिराचे अजून बरेचसे काम बाकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचा अजून दुसरा मजला बांधणे बाकी आहे. शिखराचे काम आणि आधीच बसवलेली शिल्पेही काही प्रमाणात पूर्ण करून पॉलिश करावी लागणार आहेत. तसेच दुसऱ्या मजल्यावर राम-सीता विराजमान होणार आहेत. त्यांच्यासोबत भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तीही मंदिरात बसवल्या जाणार आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार, स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले की, नवीन राम मंदिर संकुलात एकूण 13 मंदिरे बांधली जाणार आहेत. ज्यामध्ये 5 प्रमुख देवतांची (गणपती, सूर्य, शिव, विष्णू आणि देवी) मंदिरे आहेत. तसेच नवीन राममंदिर संकुलात 6 मंदिरे बांधली जातील आणि 7 मंदिरे संकुलाबाहेर बांधली जातील. हनुमानजींचे वेगळे मंदिर बांधले जाईल. सीता रसोई आहे तिथे अन्नपूर्णा मातेची स्थापना केली जाईल. तेथून सर्वसामान्यांना मंदिराचा प्रसाद मिळेल.
आत्तापर्यंत मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजे 1100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तसेच संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जातील असा आमचा अंदाज आहे. आमच्याकडे अजून 3000 कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती, स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी दिली.
पुढे त्यांनी सांगितले की, देशभरातून अजूनही देणग्या मिळत आहेत. मात्र, अद्याप परदेशातून देणगी आलेली नाही. एफसीआरए सुविधेअभावी परदेशातून देणग्या घेता येत नाहीयेत. तसेच येत्या 2-3 महिन्यांत परदेशातूनही देणग्या येऊ लागतील, असेही महाराजांनी सांगितले.