आज (24 जानेवारी) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. सध्या रोहित पवार हे ईडी कार्यालयात असून बारामती अॅग्रो प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच एकिकडे रोहित पवारांची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
जोपर्यंत रोहित पवार ईडीच्या कार्यालयातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. गेल्या पाच तासांपासून रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे ईडी कार्यालयाच्या जवळच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसून आहेत.
तसेच काही वेळापूर्वी रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्या म्हणाल्या की, सत्यमेव जयते, विजय हा सत्याचाच होईल. हा काळ संघर्षाचा असून आव्हाने येत आहेत. पण आम्ही या आव्हानांवर मात करू आणि सत्याच्याच मार्गाने चालू.
माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की, ते रोहित पवारांची बाजू ऐकून घेतील. आम्ही या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, असे वक्तव्यही सुप्रिया सुळेंनी केले होते.