काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. मणिपूरमधून या यात्रेची सुरुवात झाली आहे. मात्र ही यात्रा आसाम येथे पोहोचली असता यात्रेत मोठा गोंधळ झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले आहे. मात्र यावर बोलताना मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवू शकतात, मात्र देशाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस आपली भारत जोडो न्याय यात्रा पूर्ण करेल असे खासदार गौरव गोगोई म्हणाले.
मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. आसाम सरकार एफआयआर दाखल करत आहे. त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे. मात्र आम्ही आमची यात्रा सुरूच ठेवू. भाजपाने धर्म आणि भाषेच्या आधारावर देशाचे विभाजन करत राहावे. परंतु, आम्ही भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशाला जोडत राहू”, असे आसाममधील कालियाबोर येथील काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई म्हणाले.
भारत जोडो न्याय यात्रेच्या वेळेस गुवाहाटी पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवले आहे. हे एफआयआर यात्रेमध्ये हिंसाचारासारखी कृत्ये केल्याबद्दल नोंदवण्यात आले आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा प्रभारी कन्हेया कुमार आणि इतर व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधींना अटक केली जाईल असे आसाम सरकारने सांगितले.
”लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही राहुल गांधींना अटक करू. आधी अटक केल्यास त्याचे राजकारण केले जाईल. आता गुन्हा दाखल झाला आहे. एसआयटी तपास करेल आणि आमच्याकडे पुरावे आहेत. त्यांनी दिलेल्या चिथावणीमुळे गुवाहाटीमध्ये मोठी घटना घडण्याची शक्यता होती. आम्हाला लोकसभा निवडणुकीआधी राजकारण करायचे नाही कारण आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत”, असे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले.