22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानंतर मंगळवारपासून (23 जानेवारी) राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.पहिल्याच दिवशी रामभक्तांची एवढी मोठी गर्दी झाली होती की प्रशासनही भारावून गेले होते. प्रशासनाच्या टीमला लोकांना सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अशातच बुधवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये अयोध्येला जाणे टाळावे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील वाढत्या गर्दीमुळे आणि सामान्य भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांना फेब्रुवारीमध्ये अयोध्येला दर्शनासाठी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुमारे 5 लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच लाखो लोक पहाटे 3 वाजल्यापासून रामलल्लाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने आता दर्शनाची वेळही वाढवली आहे. आता भाविक रामलल्लाचे दर्शन रात्री 10 वाजेपर्यंत घेऊ शकतात. तसेच सकाळी भाविकांना 7 ते 11.30 या वेळेत दर्शन घेता येणार आहे.