आज आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. तसेच थोड्याच वेळात कर्तव्यपथावर भारतीय सैन्य दले आपली ताकदीचे प्रदर्शन करणार आहेत. दरम्यान ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करून या शुभेच्छा दिल्या. एक्स वरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याबाबद्दल ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवानंतर सुरु झालेल्या अमृत कालच्या प्रवासाच्या भव्य सोहळ्यात देशाचे नेतृत्व करतील. विकसित भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, ‘आत्मनिर्भर’ सैन्य पराक्रम आणि महिला शक्ती या ९० मिनिटांच्या परेडचे प्रमुख वैशिष्ठ आहे. ज्यामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या परेडमध्ये देशाच्या संरक्षण दलांच्या शक्तीचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक शस्त्रे, सैन्यदलांचे संचलन आणि अनेक राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहेत.
‘विकसित भारत’ आणि ‘भारत-लोकतंत्र की मातृका’ या दुहेरी थीमवर आधारित, यावर्षीच्या परेडमध्ये सुमारे १३,००० विशेष पाहुणे उपस्थित होणार आहेत. प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी १०.३० वाजता सुरु होईल आणि सुमारे ९० मिनिटे ही परेड सुरु असेल. या परेडची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर होईल. या ठिकाणी पंतप्रधान मोदी हे शहीद वीरांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहतील.