भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर भारताची सैन्य दले आपली ताकदीचे प्रदर्शन जगाला दाखवत आहेत. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण केल्यानंतर संचलनाला सुरुवात झाली. अनेक विविध रेजिमेंटच्या तुकड्यांनी कर्तव्यपथावर संचालन केले. त्यानंतर सांस्कृतिक विविधतेचे दर्शन तिथे पाहायला मिळाले. महाराष्ट्रासह अनेक राज्याचे चित्ररथ येथे सहभागी झाले होते. तसेच जवानांनी अनेक प्रकारच्या कवायती देखील संचलनामध्ये करून दाखवल्या. तसेच भारतीय वायू दलाच्या जवानांनी हवेमध्ये देखील लढाऊ विमाने , हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून वायू दलाची ताकद जगाला दाखवून दिली. भारताकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये असा इशारा देखील शत्रू देशांना या परेडमधून देण्यात आला.
भारतीय वायू दलाच्या हलके लढाऊ विमान ‘तेजस’, राफेल, एसयू-३०, मिग-२९, पी-८आय, जग्वार, डकोटा, डॉर्नियर, सी-१७, सी-१३०जे तसेच लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, प्रगत हलके हेलिकॉप्टर आणि अपाचे सारखे जुने आणि आधुनिक विमानात तेजस, नेत्रा, वरुण, वजरंग, त्रिशूल, अमृत, प्रचंड, अर्जन आणि टांगैल या विमानांनी चित्तथरारक कवायती दाखवल्या. त्यानंतर सर्वात शेवटी राफेल लढाऊ विमान, व्हर्टिकल चार्ली यांनी देखील साहसी कवायतींचे प्रदर्शन केले.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने दिवसेंदिवस सशक्त होत जाणारी भारताची सैन्य शक्ती पाहायला मिळाली. या परेडमध्ये भारताकडे असणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांसह विविध राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले. तसेच यंदाच्या परेडमध्ये महिलांची तुकडी देखील आपल्याला संचालन करताना दिसली. दरम्यान, ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये जमिनीपासून आकाशापर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल १४ हजार जावं सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच राजधानी दिल्लीच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत.