आज देशभरामध्ये ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर कर्तव्यपथावर भारतीय सैन्य दलांनी चित्तथरारक कवायतींचे प्रदर्शन केले. सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. ध्वजारोहण झाल्यानंतर परेडला सुरुवात करण्यात आली. परेड संपल्यानंतर नेहमीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित नागरिकांना अभिवादन करण्यासाठी कर्तव्यपथावरून चालत जाताना पाहायला मिळाले. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित प्रेक्षकांचे आभार देखील मानले.
आजच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परेडला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी वायू सेनेच्या हेलिकॉप्टर्सनी अवकाशामध्ये कसरती करून दाखवत परेडला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देण्यात आली. त्यानंतर T-90 रणगाड्यातील लेफ्टनंट फैज सिंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली. या रणगाड्याला भीष्म नावानेही ओळखले जाते आणि हे भारतीय लष्कराचे धोकादायक शस्त्र आहे. त्यामागे भारतीय बनावटीचे नाग क्षेपणास्त्र धावत होते.यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. विविध रेजिमेंटच्या तुकड्यांनी कर्तव्यपथावर संचलन केले. संचलनामध्ये वायुसेना, नौदल आणि लष्करातील महिला सैनिकांनी देखील परेडमध्ये सहभाग घेतला होता. यंदाच्या परेडमध्ये महिला सैनिकांच्या तुकड्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सर्व परेड संपल्यानंतर राष्ट्रपती आणि फ्रान्सचे अध्यक्ष हे राष्ट्रपती भवनाकडे निघाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित नागरिकांना अभिवादन करण्यासाठी कर्तव्यपथावरून चालत जाताना दिसून आले.