भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाच्या आमदारांना पक्षांतर करण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांची ऑफर देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. भाजपाने आपच्या आमदारांशी चर्चा देखील केल्याचा दावा त्यांनी केला. भाजपा नेत्याचे संभाषण टेप रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा आप ने केला आहे. भाजपा विरुद्ध केजरीवाल हा संघर्ष काही नवीन नाहीये, त्यात आता केजरीवालांच्या या आरोपांमुळे आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणाले, ”अलीकडेच त्यांनी आमच्या सात आमदारांशी संपर्क साधला आहे आणि त्यांना सांगितले आहे की. आम्ही काही दिवसांनी केजरीवालांना अटक करू. त्यानंतर आम्ही आमदार फोडू. २१ आमदारांशी बोलणी झाली आहेत. इतरांशी बोलणी सुरु आहेत. त्यानंतर आम्ही दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे सरकार पाडू. तुम्ही देखील येऊ शकता. २५ कोटी रुपये देऊ.”
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ”भाजपाने २१ आमदारांशी संपर्क सोडल्याचा दावा केला असला तरी, आमच्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ ७ आमदारांशी संपर्क करण्यात आला होता आणि त्या सर्वानी नकार दिला. ”याचा अर्थ असा आहे की, मला कोणत्याही दारू घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी अटक केली जात नाही, तर ते दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार पाडण्याचा कट रचत आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. पण त्यांना यश मिळाले नाही. देव आणि जनतेने आम्हाला नेहमीच साथ दिली. आमचे सर्व आमदारही एकजुटीने खंबीर आहेत,” असे केजरीवाल म्हणाले.
”आमच्या सरकारने दिल्लीतील लोकांसाठी किती काम केले आहे, हे या लोकांना माहित आहे. त्यांनी अनेक अडथळे आणूनही आम्ही खूप काही मिळवले आहे. दिल्लीतील जनतेचे ‘आप’वर अपार प्रेम आहे. त्यामुळे ‘आप’ला पराभूत करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांना बनावट दारू घोटाळ्याच्या निमित्ताने अटक करून सरकार पाडायचे आहे,” असे केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, भाजपाने केजरीवाल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.