देशामध्ये लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. २०१४ पासून सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला काहीही करून पराभूत करायचे असे पक्के ठरवून देशातील विरोधी पक्ष एकत्रित आले. त्यानंतर त्यांनी या आघाडीला ‘इंडिया’ आघाडी असे नाव दिले. मात्र दोन दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पंजाबमध्ये देखील आप पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशामध्ये ११ जागा लढवणार असल्याची घोषणा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी केली आहे. मात्र सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस या फॉर्म्युल्यावर सहमत नसल्याचे वृत्त येत आहे.
”काँग्रेससोबत आमची युती ११ जागांसह एक चांगली सुरुवात करत आहे. हा कल विजयी समीकरणासह पुढे जाईल. ‘इंडिया’ आघाडी आणि ‘पीडीए’ रणनीतीमुळे इतिहास बदलेल”, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हा निर्णय काँग्रेसचा नसून, अखिलेश यादव यांचा आहे असे सांगत काँग्रेसने करार मान्य केला नाहीये.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. देशातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि मित्रपक्षाने ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. तर सपा-बसपा युतीने १५ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ १ जागा जिंकता आली होती. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये ५० जागा लढवेल असे काँग्रेसच्या पक्षाने सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.