काल राज्य सरकारने सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढला. त्यानंतर संपूर्ण मराठा समाजात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आल्यानंतर मनोज जरांगे अंतरवली सराटीत आले आहेत. यावेळी अंतरवालीत मनोज जरांगेंनी सभा घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. जरी आपल्या बाजूने कायदा झाला असला तरी आपल्याला आंदोलन सुरू ठेवायचे आहे, असे जरांगेंनी म्हटले आहे.
काल मध्यरात्री मनोज जरांगे अंतरवली सराटीत आले होते. यावेळी त्यांचे ढोलताशे वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच आज दुपारी जरांगेंनी अंतरवालीत एक सभा पार पडली. या सभेत त्यांनी नव्या अध्यादेशाचे महत्त्व सांगत आंदोलन सुरू ठेवायचे की नाही याबाबत समाजासोबत चर्चा केली. यावेळी मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू ठेवण्याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली.
नव्या अध्यादेशानुसार जोपर्यंत मराठा समाजाच्या नोंदी नसलेल्या सोयऱ्याला कुणबीप्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन यशस्वी झाले आणि नव्या कायद्याची अंमलबजावणी झाली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे हे आंदोलन नोंदी नसलेल्या सोयऱ्याला एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत सुरूच ठेवले पाहिजे, असे मत मनोज जरांगेंनी व्यक्त केले. तसेच याला ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगेंचे आंदोलन अजूनही सुरूच राहणार आहे.