नवी दिल्ली: आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी प्रत्येक भागधारकाच्या सहकार्याची गरज आहे, असे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.
यावेळी अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी भारताच्या जीडीपीला $5 ट्रिलियनचा टप्पा पार करावा लागेल. तसेच ‘फेसलेस असेसमेंट’ आणि ‘सिंगल विंडो क्लीयरन्स’ सारखे सीमाशुल्क विभागाचे उपक्रम देखील विकसित करण्याची गरज आहे.
‘आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन 2024’ निमित्त एका लेखी संदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारताचा ‘अमृत काल’ सध्या सुरू असून यादरम्यान सर्व भागधारकांनी एकत्र येणे आणि नागरिकांच्या फायद्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ – सबका विकास’ या घोषणेला प्रतिध्वनी देणारी या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनाची थीम “Customs Engaging Traditional and New Partners with Purpose” अर्थात विशिष्ट उद्देशाने पारंपरिक आणि नव्या भागीदारांना जोडणारा सीमाशुल्क विभाग अशी आहे. तसेच 2027-28 पर्यंत भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी प्रत्येक भागीदाराने सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.