प्रिती रजक ही शनिवारी भारतीय लष्कराची पहिली महिला सुभेदार बनली आहे. प्रिती ही एक चॅम्पियन ट्रॅप नेमबाज आहे. लष्कराने सांगितले की, हा भारतीय लष्करासह देशातील महिलांसाठी अभिमानाचा क्षण आहे. ट्रॅप नेमबाज हवालदार प्रिती रजकला सुभेदार पदावर बढती देण्यात आली. त्यामुळे आता सुभेदार प्रिती रजक ही भारतीय लष्कराची पहिली महिला सुभेदार बनली आहे.
प्रिती रजकचे हे यश स्त्रीशक्तीचे विलक्षण प्रदर्शन आहे. प्रीती डिसेंबर 2022 मध्ये लष्कराच्या मिलिटरी पोलीस कॉर्प्समध्ये रुजू झाली होती. नेमबाजीतील तिच्या असाधारण क्षमतेसाठी आर्मीमध्ये हवालदार म्हणून नामांकन मिळालेली ती पहिली गुणवंत खेळाडू आहे. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रीतीने ट्रॅप महिलांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे.
सुभेदार प्रिती सध्या भारतात सहाव्या क्रमांकावर आहे (ट्रॅप महिला स्पर्धा). पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तयारीसाठी ती आर्मी मार्क्समनशिप युनिट (AMU) मध्ये प्रशिक्षण घेत आहे. लष्कराने सांगितले की, प्रितीच्या अपवादात्मक कामगिरीच्या आधारे तिला सुभेदार पदावर पहिली आउट-ऑफ-टर्न बढती देण्यात आली आहे.
प्रिती रजकची ही मोठी कामगिरी तरुणींना सैन्यात भरती होण्यासाठी तसेच व्यावसायिक नेमबाजीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी प्रेरित करेल. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त सुभेदार मेजर आणि मानद लेफ्टनंट जितू राय यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सुभेदार मेजर आणि मानद कॅप्टन या पदावर पदोन्नती देण्यात आल्याचेही लष्कराने म्हटले आहे.