नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन येथे राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. नितीश कुमार यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे. तसेच नितीश कुमार आज संध्याकाळी 5 वाजता बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असे म्हटले जात आहे. अशातच आता नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासह 8 नेते आज शपथ घेणार आहेत. यामध्ये तीन भाजप नेते, तीन जेडीयू नेते आणि एक एचएएम आणि एका अपक्ष नेत्याचा समावेश आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची चर्चा आहे. तर डॉ.प्रेम कुमार (भाजप), विजय कुमार चौधरी (जेडीयू), बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू), श्रवण कुमार (जेडीयू), संतोष कुमार सुमन (हम), सुमित कुमार सिंग (अपक्ष) मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील भाजपचे प्रभारी विनोद तावडे म्हणाले की, “आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भाजपच्या आमदारांनी राज्यात एनडीएचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी राज्यपाल राजेंद्र व्ही आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यपालांनी कुमार यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर राजभवनातून परतल्यानंतर नितीश पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ‘महाआघाडी’पासून वेगळे होऊन नवी आघाडी स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.