अहमदाबाद, 28 जानेवारी : गुजरातच्या कच्छमध्ये आज, रविवारी भूकंपाचे धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 इतकी नोंदलण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू भचाऊच्या उत्तर-ईशान्येस 21 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.
देशात गुजरातसोबतच दिल्ली-एनसीआर, पंजाबसह चंदीगड आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपामुळे जमीन हादरली. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हिंदुकुश प्रदेशात रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 इतकी होती. गेल्या काही दिवसापासून भारतात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तिबेटच्या खाली असलेल्या भारतीय टेक्टोनिक प्लेट फुटत आहे. त्यामुळे देशाचा रक्षक असलेल्या हिमालयाची उंचीही वाढत आहे. एका नव्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय टेक्टोनिक प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली जात असल्याचे वैज्ञानिकांच्या नवीन विश्लेषणातून समोर आले आहे. त्यामुळे तो फुटत आहे. पण वरचा भाग म्हणजे युरेशियन प्लेट वाढत आहे आणि पसरत आहे. त्यामुळे हिमालयाची उंची वाढत आहे. तसेच हिमालयीन पट्ट्याच्या आसपास भूकंपाचे प्रमाण वाढले आहे.