झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन जमीन घोटाळ्यासंदर्भात त्यांचा जबाब नोंदवला होता. मात्र आज पुन्हा एकदा ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. कदाचित आज त्यांना जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. २७ जानेवारी रोजी ईडीने सोरेन यांना समन्स पाठवले होते, असे अधिकृत सूत्रांनी पीटीआयला सांगितले. ईडीने आतापर्यंत सोरेन यांना तब्बल ९ वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी हजार रहाण्याचे निर्देश दिले होते. तसेच २९ किंवा ३१ जानेवारी पैकी एका दिवशी हजर रहाण्याचे निर्देश दिले होते.
ईडीने या प्रकरणामध्ये पहिल्यांदा २० जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जबाब नोंदवला होता. त्यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे सात त्यांचा जबाब नोंदवला. हा जबाब मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत नोंदवण्यात आला आहे. त्या दिवशी चौकशी पूर्ण झाले नसल्याने आज ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स पाठवले आहे. झारखंड मध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार आहेत. या पक्षाचे अध्यक्ष असलेले हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत. सोरेन यांनी झारखंडमधील सरकार अस्थिर करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केंद्रातील भाजपा सरकारने केला असल्याचा आरोप केला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, तपास यंत्रणांनी राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाच्या मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीचा भाग म्हणून सोरेन यांचे माध्यम सल्लागार, साहिबगंज जिल्ह्यातील अधिकारी आणि माजी आमदार यांच्या जागेवर छापे टाकले होते.ईडी २०२२ पासून राज्यातील बेकायदेशीर खाणकामातून निर्माण झालेल्या १०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याची चौकशी करत आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत या प्रकरणात १४ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे. रंजन यांनी राज्याच्या समाज कल्याण विभागाचे संचालक आणि रांचीच्या उपयुक्त म्हणून काम केले होते.