देशात लवकरच लोकसभेच्या आणि काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ‘इंडिया’ आघाडी झाली असली तरी तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान आम आदमी पार्टी आता हरियाणा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हरियाणातील एका सभेला संबोधित करत होते. यावेळी केजरीवाल म्हणाले, आम आदमी पक्ष हरियाणातील सर्व ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर लोकसभा निवडणूक ‘इंडिया’ आघाडी बरोबर युती करून लढवली जाणार आहे. पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, ”लोकसभा निवडणूक लवकरच होणार आहे. तुम्हाला माहिती आहेच की, ‘इंडिया’ आघाडी तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही हरियाणामध्ये सर्व ९० जागांवर एकट्याने लढणार आहोत.”
”विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये आहेत. हरियाणामध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येईल याचा निश्चय करा. मला खात्री आहे की, आम्ही सरकार स्थापन करू”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. सध्या पंजाब आणि दिल्लीमध्ये आपचे सरकार आहे. आम आदमी पक्ष आता हरियाणावर राज्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
हरियाणामध्ये २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा विजय मिळवला होता. भाजपाने ४० जागा, काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या. दुष्यंत चौटाला यांनी स्थापन केलेल्या जननायक जनता पक्षाने (जेजेपी) 10 जागा जिंकल्या आणि सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला.