आज (30 जानेवारी) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर येणार आहेत. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी किल्ले रायगडावर येणार आहे. याआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी मराठा आरक्षणानंतर धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी लढणार असल्याचे म्हटले आहे. “आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. त्यामुळे मराठ्यांचा हा प्रश्न सुटला की, धनगर आणि मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्यासाठी मी लढणार आहे. त्यांना आरक्षण कसे मिळत नाही तेच मी बघतो”, असे मनोज जरांगे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “धनगर, मुस्लीम समाजाचाही प्रश्न सुटला पाहिजे, असे माझे मत आहे. पण त्यांनीही हा प्रश्न सुटण्यासाठी बोलले पाहिजे. धनगर आणि मुस्लीम बांधव आरक्षणाबाबत बोलले तर मग मी पाहतो सरकार त्यांना आरक्षण कसे देत नाही.”
“आम्ही मराठा आरक्षणासाठी भांडत राहणार. ज्यावेळी मराठा समाजाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईल त्यादिवशी गुलाल उधळून महादिवाळी साजरी केली जाईल”, असेही जरांगे म्हणाले.