अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच निवडणुकीपूर्वी सरकारकडून अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकार बजेटमध्ये पीएम किसान निधी योजनेचा हप्ता वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. सरकार PM किसान सन्मान निधी 9000 रुपयांपर्यंत वाढवू शकते. असे झाल्यास, PM किसान निधीचा सध्याचा हप्ता 50 टक्क्यांनी वाढेल.
तसेच मोदी सरकार महिला शेतकऱ्यांना पीएम किसान फंडातून 10,000 ते 12,000 रुपये देऊ शकते. सध्या देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये मिळतात.
रोजगार निर्मितीसाठीही सरकार प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत रेल्वेसारख्या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. या सगळ्याशिवाय मोदी सरकार हेल्थकेअर क्षेत्रावर विशेष लक्ष देऊ शकते. असे मानले जात आहे की आयुष्मान कार्डधारकांसाठी मोठी बातमी येणार आहे. सध्याच्या विमा रकमेत वाढ करण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकते.
दरम्यान अर्थसंकल्पापूर्वी नुकताच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रकारांनी याबद्दल विचारले त्यावेळी त्यांनी यंदा निवडणुकांमुळे हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. त्यामुळे या अर्थसंकल्पात केंद्र सरकारला केवळ खर्चाची तरतूद करावी लागले. निवडणुकीनंतर आलेले नवीन सरकार पुन्हा एकदा पूर्ण अर्थसंकल्प सादर करत असते. म्हणूनच अशा परिस्थितीत कोणतीही थेट मोठी घोषणा सरकारला करता येणार नसल्यामुळे आता सरकार यातून कसा मार्ग काढणार याकडे लक्ष लागले आहे.