अंतरिम अर्थसंकल्प 2024 गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (31 जानेवारी) सुरूवात झाली आहे आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवीन संसदेत प्रथमच दोन्ही सभागृहांच्या (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामकाजाची आणि आर्थिक धोरणांची रूपरेषा मांडली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
१. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, नवीन सभागृहातील त्यांचे हे पहिलेच भाषण आहे. इथे संसदीय परंपरांचा अभिमान आणि एक भारत – श्रेष्ठ भारताचा गंध आहे. जगात गंभीर संकटे असूनही भारत वेगाने विकसित होत आहे. सरकारने अनेक महत्त्वाची विधेयके आणली आहेत. हा कायदा विकसित भारत साध्य करण्यासाठी एक मजबूत पुढाकार आहे. फौजदारी न्याय व्यवस्था आता इतिहासजमा झाली आहे.
२. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तसेच जगातील गंभीर संकटांमध्ये भारत सर्वात वेगवान वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे.
३. देशाच्या तरूण पिढीने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा करून पुन्हा स्वातंत्र्याचा काळ जगला. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना राष्ट्राने सलाम केला आहे.
४. अयोध्येत राम मंदिर बांधण्याची अपेक्षा शतकानुशतके होती. तर अखेर आज राम मंदिर बांधले गेले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून 370 हटवण्याबाबत शंका होत्या.आज तो इतिहास आहे. सोबतच या संसदेने तिहेरी तलाकविरोधातही कडक कायदा केला.
५. भारताने आयोजित केलेल्या यशस्वी G20 शिखर परिषदेने भारताची भूमिका मजबूत केली आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 100 हून अधिक पदके जिंकली.
६. गेल्या काही वर्षांत जगाने दोन मोठी युद्धे पाहिली आणि कोरोनासारख्या महामारीचा सामना केला. एवढी जागतिक संकटे असतानाही माझ्या सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली आणि सर्वसामान्य भारतीयांवर बोजा वाढू दिला नाही.
७. माझ्या सरकारचा विश्वास आहे की विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील.