ज्ञानवापी येथील प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाने याबतीत एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हिंदूंना आता ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करता येणार आहे. न्यायालयाने हिंदू याचिकाकर्त्यांना वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या पूर्वी सीलबंद तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. वाराणसी येथील न्यायालयाने बुधवारी दुपारी हा निर्णय दिला. आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, विश्वनाथ मंदिरातील पुजारी पूजा करू शकतात.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रवेश रोखण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील हटविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ASI च्या सर्वेक्षणाच्या वेळेस तळघर सील करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पत्रकारांशी संवाद साधताना हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, ”हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला ७ दिवसांच्या आत व्यवस्था करावी लागेल. आता प्रत्येकाला पूजा करण्याचा हक्क आहे.”
चार महिला फिर्यादींनी उत्खनन आणि मशिदीच्या सीलबंद भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही दिवसांनी वाराणसी न्यायालयाचा हा आदेश आला आहे. वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या बांधकामापूर्वी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात असल्याचे हिंदू बाजूनुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.
दरम्यान, ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या रिपोर्टनुसार जी माहिती समोर आली आहे की, ”सध्या असलेल्या संरचनेच्या बांधकामापूर्वी तेथे एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते.” अशी माहिती समोर आल्यानंतर ज्ञानवापी मशिदीच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हिंदू मंदिरांच्या पुराव्याची पुष्टी करणारा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर, वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीत आजचा जुम्मा (प्रत्येक शुक्रवारी मुस्लिम समाजाकडून केली जाणारी प्रार्थना) याला विशेष महत्व आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.