आज (1 फेब्रुवारी) देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मोदी सरकारने शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा. हे सगळे जादूचे प्रयोग असून हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. तसेच निर्मला सीतारामण यांनी जड अंत करनाने हा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. ठाकरे हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी पेणे येथे त्यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे.
निर्मला सीतारामण गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या जातीसाठी काम करणार असे म्हणाल्या. हे धाडस त्यांनी केले याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच सीतारामण जी तुम्ही महिलांबद्दल बोलत आहात तर मग तुम्ही मणिपूरकडे का जात नाही? बिलकीस बानूकडे तुम्ही जा, सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांना तुम्ही आतेरेकी समजत होतात आणि आता तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात. हे सगळे जादूचे प्रयोग सुरू आहेत. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. तुम्ही आता महिलांना सिलेंडर फुकट देणार, तरूणांना नोकऱ्या देणार असे म्हणालात. मग मागील 10 वर्षे तुम्ही काय केले? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.