आज (1 फेब्रुवारी) संसदेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, या अंतरिम अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताचा पाया मजबूत करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अंतरिम अर्थसंकल्प 2024 विकसित भारताचा पाया मजबूत करेल. तरुण आणि बेरोजगारांना संधी वाढतील. महिलांसाठी अनेक योजना आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. यामध्ये सातत्य ठेवण्याची हमी आहे. हे विकसित भारतातील तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या 4 स्तंभांना सक्षम करेल.तसेच हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची हमी देतो.
आम्ही एक मोठे उद्दिष्ठ ठरवतो आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यापेक्षा आणखी मोठे उद्दिष्ठ समोर ठेवतो. आम्ही ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांना 4 कोटींहून अधिक घरे देण्याचे उद्दिष्ठ पूर्ण केले आहे तसेच आता आम्हाला 2 कोटी घरांचे उद्दिष्ठ गाठायचे आहे.तर देशात 2 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आमचे लक्ष्य होते. ते वाढवून आता 3 कोटी करण्यात आले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.