अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी योजनांची माहिती, तसेच गेल्या पाच वर्षांमधील अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी लखपती दीदींबद्दल देखील माहिती दिली. यंदा लोकसभा निवडणूक होणार असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. तसेच जुलैमध्ये नवीन आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार सांगितले. देशभरात आणखी १५ एम्स रुग्णालये उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान आजच्या अर्थसंकल्पावर अनेक राजकीय नेत्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आजच्या अर्थसंकल्पावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आजच्या अर्थसंकल्पावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे. विशेषतः गरीब, मध्यमवर्गीय, महिला, शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेले आहे. एक कोटी लोकांना तीनशे रुपयांपर्यंतची वीज मोफत देण्याचा विषय असेल किंवा गरीब, मध्यमवर्गीय, झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचे घर घेता यावे किंवा आहेत ते घर विकत घेता यावे, याकरिता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातून मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. विशेषतः युवांकरिता जो एक मोठा निधी उभारण्यात आलेला आहे. यातून रोजगाराची निर्मिती होणार आहे. विशेषतः लखपती दीदी हा जो कार्यक्रम आहे की, ज्याच्या अंतगर्त तीन कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा आहे. विकासाकरिता जवळपास अकरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. ज्यामध्ये नवीन रेल्वे कॉरिडॉर्स, नवीन रस्ते, मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा हे तयार करण्यात येणार आहे.”
दरम्यान, केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. निवडणूक असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्र सरकारने केलेली चांगली धोरणे आणि काम यामुळे सलग तिसऱ्यांदा भाजपाला सत्तेत परत येण्यास मदत करेल अशी अशा सीतारमण यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्प सादर करताना या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत असे सांगितले. निर्मला सीतारमण यांनी सहावा आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या संकल्पनेखाली सर्वसमावेशक विकासासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. निर्मला सीतारमण म्हणाल्या, ”आमच्या सरकारने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास ही मूल्ये मजबूत करण्यासाठी प्रयत्न केली. तसेच सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे.”