अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (1 फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने जनतेसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साध्य करण्यासाठी आराखडा दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे, असे अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले, 2047 पर्यंत विकसित भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साध्य करण्यासाठी आराखडा दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे. तसेच भारत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हावा यासाठी मोदी सरकारने मागील 10 वर्षांमध्ये केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीवर या अर्थसंकल्पात प्रकाश टाकण्यात आला आहे.
मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प पर्यटन क्षेत्राला नवी उर्जा देण्यास मदत करेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी प्रोत्साहन आणि दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज राज्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि पर्यंटन क्षेत्राची अर्थव्यवस्था बळकट होईल, असे अमित शाह म्हणाले.
पुढे ते म्हणाले, सरकारच्या या विकसित भारत अर्थसंकल्पाने देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नवीन संधी आणल्या आहेत. तसेच आयुष्मान भारत योजनेद्वारे पंतप्रधान मोदींनी 30 कोटींहून जास्त लोकांना 5 लाख रूपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवले आहेत. तसेच या अर्थसंकल्पात आयुष्मान योजनेशी आंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या वर्गालाही मोफत उपचाराचा लाभ घेता येईल, असेही अमित शाह म्हणाले.