ज्ञानवापी येथील प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाने याबतीत एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हिंदूंना आता ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करता येणार आहे. न्यायालयाने हिंदू याचिकाकर्त्यांना वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या पूर्वी सीलबंद तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पूजा देखील करण्यात आली आहे. वाराणसी न्यायालयाने तळघरात पूजा करण्याची परवानगी दिल्यानंतर ‘व्यास का तहखाना’चे नाव ‘ताल गृह’ किंवा ‘ताल घर’ असे ठेवले जावे अशी मागणी काशी विश्वनाथ ट्रस्टचे अध्यक्ष नागेंद्र पांडे यांनी केली.
या सर्व प्रकरणामध्ये आता वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या मस्जिद इंतेजामिया समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑर्डर७, ऑर्डर ११ अंतर्गत खटल्याच्या देखभालीबाबतच्या याचिकेवर निर्णय घेण्यात आलेला नाही, असा युक्तिवाद पॅनेलने आपल्या याचिकेत केला आहे. तसेच विवादित भागात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी देणारा आदेश योग्य नाही असे याचिकेत म्हणण्यात आले आहे.
दरम्यान, वाराणसी न्यायालयाने हिंदूंना ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर मुस्लिम समाजाने या निर्णयाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . वाराणसी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिल्यामुळे ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच सर्व परिसरावर ड्रोनच्या माध्यमातून गस्त घालण्यात येत आहे.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रवेश रोखण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील हटविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ASI च्या सर्वेक्षणाच्या वेळेस तळघर सील करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पत्रकारांशी संवाद साधताना हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, ”हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला ७ दिवसांच्या आत व्यवस्था करावी लागेल. आता प्रत्येकाला पूजा करण्याचा हक्क आहे.”
चार महिला फिर्यादींनी उत्खनन आणि मशिदीच्या सीलबंद भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही दिवसांनी वाराणसी न्यायालयाचा हा आदेश आला आहे. वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या बांधकामापूर्वी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात असल्याचे हिंदू बाजूनुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.