भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. हा दिवस पूर्णपणे भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नावावर होता. यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी करत आपले पहिले शतक पूर्ण केले आणि दिवसअखेर त्याची धावसंख्या 179 होती. तर टीम इंडियाने पहिल्या दिवशी 6 विकेट्स 336 धावांपर्यंत मजल मारली.
भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा उत्कृष्ट फलंदाज आहे, त्याला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने हे सिद्ध केले आहे. आज पुन्हा एकदा यशस्वीने विशाखापट्टणममध्ये अप्रतिम कामगिरी केली. ओपनिंगसाठी आलेल्या यशस्वीने दिवसअखेरपर्यंत क्रीज सोडली नाही. त्याने 179 नाबाद धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 17 चौकार आणि 5 षटकारही मारले.
इंग्लंडसोबत खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी पहिला दिवस चांगला ठरला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर यशस्वी जैस्वालने एकहाती कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले.
रोहित शर्मा 14, शुभमन गिल 34, श्रेयस अय्यर 27, रजत पाटीदार 32, अक्षर पटेल 27, श्रीकर भारत 17 धावांवर बाद झाला. सर्वांनी चांगली सुरुवात केली, पण क्रिझवर जास्त वेळ टिकू शकले नाही. अशाप्रकारे दिवसअखेर भारताची धावसंख्या 336/6 अशी झाली आहे. भारताकडे अजूनही 4 विकेट्स आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांना मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागणार आहे.