झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळाली. चंपई सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून त्यांना पुढील दहा दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासर्व घडामोडी सुरू असताना राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा झारखंड राज्यात पोहोचली आहे. यावेळी राहून गांधींनी भाजपावर टीका केली आहे.
भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये आल्यावर राहुल गांधींनी एका सभेला संबोधित केले. तेव्हा त्यांनी ”भाजपाने झारखंडमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र आता ‘इंडिया’ आघाडी त्यांच्या षडयंत्राच्या विरोधात उभी आहे. पैसा, शक्ती आणि तपास यंत्रणा असलेल्या भाजपला काँग्रेस पक्ष घाबरत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. भाजपाने झारखंडमध्ये जे सरकार लोकांनी निवडून दिले होते, ते अस्थिर करण्याचा प्रयत्न केला मात्र ‘इंडिया’ आघाडी त्यांच्या या षडयंत्राविरोधात उभा राहिला व त्यांना जनादेशाचा अनादर करून दिला नाही.”
दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये दाखल होताच नवनियुक्त मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी यात्रेचे व राहुल गांधींचे जोरदार स्वागत केले. पूर्वीची भारत जोडो यात्रा आरएसएस आणि भाजपाच्या “विभाजनकारी अजेंडाच्या” विरोधात होती. मात्र आताची यात्रा आता देशातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रींग या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका ऐकून घेण्यास नकार देत झारखंड उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. तसेच हेमंत सोरेन यांना ईडी कोर्टाने ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे. यामुळे सोरेन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.