उल्हासनगरमध्ये शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. आपसांतील वैमनस्य आणि जमिनीचा वाद यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.
या धक्कादायक घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधक आक्रमक झाले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपुस केली आहे. तसेच या प्रकरणावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रूग्णलयात जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेची पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. तसेच महेश गायकवाड यांच्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चाही केली.
पुढे या प्रकरणावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच या घटनेतून बचावलेल्या महेश गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.