दिल्ली आणि दिल्ली शेजारील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सोमवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल , त्यानंतरचे कोरडे हवामान राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्वेकडे असणाऱ्या बिहार राज्यातही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या बुलेटिनमध्ये उद्या म्हणजे ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजबाच्या काही भागांमध्ये दाट ते अति दाट धुके असण्याची शक्यता आहे. देशाच्या वायव्य भागात येत्या तीन दिवसांमध्ये तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामानात कोणताही फार बदल होणार नाही असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पर्वतीय राज्यांमध्ये तसेच जम्मू-काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये रविवारी पाच राष्ट्रीय महामार्गांसह तब्बल ४७५ रस्ते बंद करण्यात आले आहेत. शिवाय होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे ३३३ ठिकाणी वीजपुरवठा आणि ५७ ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
प्रशासनाने काश्मीरच्या डोंगराळ भागात हिमस्खलन होण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी पुढील २४ तास अनावश्यक कामे टाळावीत व सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी म्हणजेच ३ तारखेला देशाच्या वायव्य भागातून आलेल्या ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानामध्ये अनेक बदल घडले आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.