आज झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी पार पडली. यामध्ये चंपाई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. चंपाई सोरेन यांच्या सरकारने हा ठराव ४७ विरुद्ध २९ अशा फरकाने जिंकला आहे. ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली. त्यानंतर झारखंडमधील सरकार वाचवण्यासाठी चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली होती. आज त्यांनी बहुमत चाचणी जिंकली आहे. या वेळी विश्वासदर्शक ठरावादरम्यान ईडीच्या अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील विधानभवनात उपस्थित होते. हेमंत सोरेन यांनी यावेळी विधानसभेत आपले म्हणणे मांडले.
बहुत चाचणीपूर्वी हेमंत सोरेन यांनी विधानभवनात आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, ”३१ जानेवारी रोजी देशात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. माझ्या अटकेत राजभवनाचा देखील हात असल्याचा दावा त्यांनी केला. आज माळ ८.५ एकर जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जर का त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ही माझी जमीन माझ्या नावावर असल्याची कागदपत्रे दाखवावीत. जर का हे सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन.”
दरम्यान, ईडीने हेमंत सोरेन यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली आहे. कोर्टाने त्यांना ५ दिवसांची ईडी कोठडी दिली आहे. ईडीने मला केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हणत या प्रकरणातून दिलासा मिळावा यासाठी हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. तसेच रांची येथील विशेष कोर्टाने हेमंत सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावामध्ये उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली होती.