पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावाला उत्तर दिले. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. १ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकसभा निवडणूक होणार असल्याने यंदाचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणून सादर करण्यात आला. आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”प्रभू श्रीरामी केवळ आपल्या घरी परतले नाहीतर, अशा मंदिराचे निर्माण झाले आहे जे, भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेला नवीन ऊर्जा देत राहील. आदरणीय अध्यक्ष महोदय, आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ देखील फार दूर नाहीये. जास्तीत जास्त १०० ते १२५ दिवस शिल्लक राहिले आहेत. आता पूर्ण देश म्हणत आहेत ‘अब की बार चार सो पार’, केवळ देश नव्हे तर खरगे पण म्हणत आहेत ‘अब की बार चार सो पार’. अध्यक्ष महोदय मी साधारणतः आकड्यांच्या खेळामध्ये पडत नाही. मत मी पाहत आहे, देशातील जनता एनडीएला तर ४०० पेक्षा जास्त जिंकून देईलच, मात्र केवळ भारतीय जनता पक्षाला ३७० जागा नक्की जिंकून देईल. ”
देशामध्ये यावर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. एप्रिल ते मे महिन्यामध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये यासाठी सर्व विरोधक एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच सत्ताधारी एनडीएने अब कि बार ४०० पार अशी घोषणा दिली आहे. यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक रंगतदार होणार की एकतर्फी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.