मोदी सरकारचा दहाव्या अर्थसंकल्पामध्ये आठ पूर्ण अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प यांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सहावा अर्थसंकल्प हा संदिग्ध वाटला तरी देखील त्यातून अनेक संकेत देणार आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले. येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पावरील विश्लेषणात्मक व्याख्यान रविवारी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी टिळक म्हणाले, जीएसटी आणि इन्कम टॅक्स या दोन्हींमध्ये फारसे बदल नाहीत असे असले तरी वित्तीय तूट कमी करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याचा अर्थ सरकार फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटवर लक्ष केंद्रित करणार का असा विचारही करावा लागेल. तसेच जे पी मॉर्गन या जागतिक वित्त संस्थेच्या बाँड इंडेक्समध्ये चीनच्या दहा बॉण्ड्स कमी करून दहा भारतीय बाँड स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच समाविष्ट होतात हा भारताच्या समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणाचा एक प्रकारे विजय आहे.
अर्थसंकल्पात संरक्षण, सोनं, कोळसा आणि तेल या चारही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा विशेष उल्लेख नसला तरी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर या बाबत अनेक घोषणा पहावयास मिळतात. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रेल्वे, हवाई वाहतूकीचे अड्डे, बंदरे यांच्या इंटिग्रेशन चा आणि डेव्हलपमेंट चा विचार सरकार सातत्याने करत आहे. तसेच डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सरकार ६ जी भारतात आणण्याचे नियोजन करत असल्याने येत्या काळात टेलिकम्यूनिकेशन तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञानिक इन्फ्रास्ट्रक्चर या मध्ये वेगाने प्रगती करणाऱ्या संस्थांना सरकारी कंत्राटांमध्ये प्राधान्य मिळेल.