देशातील विविध अल्पसंख्याक वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारे धार्मिक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांची भेट घेण्यासाठी संसदेत पोहोचले होते. यावेळी धर्मगुरूंनी संसदेचे कामकाजही पाहिले. या काळात विविध धार्मिक नेते पीएम मोदींमुळे खूप प्रभावित झाल्याचे दिसले. देशाला पुढे नेल्याबद्दल सर्व नेत्यांनी एकमताने पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश पुन्हा विश्वगुरू बनण्याच्या जवळ असल्याचे सर्वांनी सांगितले.
नवीन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना सर्व अल्पसंख्याक धर्मगुरू म्हणाले की, आपल्या जाती, चालीरीती, धर्म, प्रार्थना पद्धती भिन्न असू शकतात परंतु माणूस म्हणून आपला सर्वात मोठा धर्म मानवता आहे.
आपण सर्व याच देशात राहतो, आपण सर्व भारतीय आहोत. चला आपला देश मजबूत करूया. आपला देश हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. आपण सर्वांनी मिळून देशाला पुढे न्यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देश पुन्हा ‘विश्वगुरु’ होण्याच्या समीप असल्याचे या नेत्यांनी सांगितले. आणि ते होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. नवीन संसद भवनाची ही दृश्ये आपल्या देशाच्या बदलत्या काळाचा पुरावा आहेत, असेही धर्मगुरू म्हणाले.
इंडियन मायनॉरिटी फाउंडेशनच्या संस्थापक हिमानी सूद यांनी सांगितले की, आम्ही 24 धार्मिक नेत्यांच्या गटाला नवीन संसदेत नेले. आम्ही पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींना भेटलो.
आम्हाला जगाला संदेश द्यायचा आहे की आम्ही एकत्र उभे आहोत, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचे समर्थन आहे आणि आम्ही एकत्रितपणे आमच्या देशाला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या ध्येयापर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की आज संसदेत धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटून मला आनंद झाला. आपल्या देशाच्या विकासाच्या मार्गावर त्यांनी दिलेल्या प्रेमळ शब्दांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यावेळी धार्मिक नेत्यांनी संसदेच्या नवीन इमारतीला भेट देऊन आशीर्वाद दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी प्रार्थना केली.