मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या अनेकदा आपली रोखठोक भूमिका मांडताना दिसतात. तसेच मनसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यापासून शर्मिला ठाकरे अनेक राजकीय भाषणे करताना दिसत आहेत. या भाषणांमधून त्यांनी अनेकदा महाविकास आघाडी आणि सत्ताधारी युतीवर टीका केली आहे. तर काल, पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पुण्यातील कोंढवा गावातील पहिल्या महिला नगरसेविका आरती बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे उपस्थि होत्या. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, लोकसभेच्या निवडणुका मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू होतील. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आमदारकीच्या निवडणुका होतील. तर पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका लागतील. पण तरीही आमची कामे थांबत नाहीत. मग आम्ही निवडून येवो किंवा न येवो आमच्या पक्षातील कामे सुरूच असतात.
पुढे शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. कोविड काळामध्ये आपल्या पक्षाने जेवढी कामे केली आहेत तेवढी कामे इतर कोणत्याही पक्षाने केली नाहीत. त्यावेळी सगळे सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते. पण आपला पक्ष हा रस्त्यावर होता. आपली चांगली चांगली पोरे कोविडमध्ये दगावली. तरी देखील मी अभिमानाने सांगेन की आमचा पक्ष एवढी चांगली कामे करतोय तर तुमचाही कुपाशिर्वाद असाच पाठिशी राहुद्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्याकडे एवढे चांगले उमेदवार आहेत, त्यांनी चांगली कामे केली आहेत पण लोकांनी मतदानावेळी चूक केली. मात्र, यावेळी लोक चूक करणार नाहीत. मला कामे करणाऱ्या उमेदवारांना वरच्या स्तरावर बघायचे आहे, असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.