उत्तरप्रदेशच्या मथुरा येथे ऐतिहासीक केशव मंदिर होते. हे मंदिर पाडून मुगल शासक औरंगजेब याने तिथे मशिद उभारली होती अशी महत्त्वपूर्ण माहिती भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) दिली आहे. मैनपुरी येथील अजय प्रताप सिंह यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या लेखी उत्तरात एएसआयने हा खुलासा केलाय.
मैनपुरी येथील अजय प्रताप सिंह यांनी देशातील वादग्रस्त जमिनींच्या संदर्भात एएसआयकडे माहिती अधिकारात माहिती विचारली होती. त्यांच्या आरटीआयला उत्तर देताना एएसआयने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भात मोठा खुलासा केलाय. एएसआयने सांगितले की, मुगल शासक औरंगजेबने मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिर तोडून त्या जागेवर मशीद उभारली होती. एएसआयने 1920 मधील ऐतिहासिक पुरावे आणि दस्तावेजांच्या आधारावर ही माहिती सादर केली आहे. शाही ईदगाह मशीदप्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात पुरावा म्हणून एएसआयचा हा अहवाल महत्त्वाचा ठरू शकतो.
भारतीय पुरातत्व विभागाने नोव्हेंबर 1920 मध्ये मथुरेतील वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण केले होते. अजय प्रताप सिंह यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत एएसआयचा तो जुना सर्वेक्षण अहवाल मागितला होता. त्यावर उत्तर देताना आग्रा येथील पुरातत्व विभागाने सांगितले की, संबंधित वादग्रस्त जागेवर कृष्णाचे मंदिर होते. मुगल बादशाह औरंगजेबाने ते मंदिर तोडले आणि त्या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधली. भारतीय पुरातत्व विभागाने 1920 मध्ये केलेल्या सर्वेक्षणातील माहिती तारखांसह प्रदान केली आहे. पुरातत्व विभागाने कृष्ण जन्मभूमी मंदिराचा 39 स्मारकांच्या यादीतही समावेश केला होता. या यादीत 37 व्या नंबरवर या मंदिराचा उल्लेख आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयात चालू असलेला हा खटला 13.37 एकर जमिनीशी संबंधित आहे. यापैकी 10.9 एकर जमीन ही श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर समितीकडे आहे. तर शाही ईदगाह मशीदीकडे अडीच एकर जमीन आहे. परंतु, हिंदू पक्षकारांनी संपूर्ण 13.37 एकर जमिनीवर दावा केला आहे. संपूर्ण जमीन आपल्या ताब्यात यावी यासाठी मंदिर समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.