गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्या घराजवळ भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून पुणे शहरात टोळीयुद्धाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता पुणे शहाराचे नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.
नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील 300 गुंडांची धिंड काढली आहे. पुण्यातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करण्यात आले होते. यामध्ये गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके यांच्यासह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात हजर करण्यात आले होते.
आज रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. तर पुणे पोलिसांनी गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके यांच्यासह 200 ते 300 गुंडांनी धिंड काढली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यात नेमणूक झाल्यानंतरची ही पहिलीच कारवाई आहे.
पुण्यातील जितके पोलीस स्टेशन आहेत त्यातील सर्व रेकॉर्डवरील गुंडांना आज आयुक्तालयासमोर बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांना दररोज ते काय करत आहेत याबाबतची माहिती देण्यासाठी सांगण्यात आले. तसेच हे सर्व गुन्हेगार 2-3 तास पोलीस आयुक्तालयासमोर उभे होते. यावेळी सर्व गुन्हेगारांना अमितेश कुमार यांनी तंबी दिली आहे.
पुण्यातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच वाढती गु्न्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस सतर्क झाल्याचेही दिसून येत आहे.