मध्य प्रदेशमधील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 63 लोकं जखमी झाली आहेत. मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या हरदा येथील मरगधा येथील ठिकाणी असलेल्या फटाक्यांच्या कारखान्याला ही भीषण आग लागली आहे. आगीचे लोळ हे आजूबाजूला असणाऱ्या 60 पेक्षा जास्त घरांमध्ये पसरले. संपूर्ण परिसरामध्ये 100 पेक्षा जास्त घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील हरदा शहरातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीच्या घटनेत झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
हरदा शहरातील कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 63 जण जखमी झाले आहेत. हा आकडा आणखी जास्त असू शकतो, असे मानले जात आहे. या अपघातानंतर नजीकच्या जिल्ह्यातील रुग्णालयांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, पीएम मोदींनी या अपघातातील मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत असल्याचे सांगितले आहे. पीएमओने सांगितले की, प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील.
राजधानी भोपाळपासून 150 किलोमीटर अंतरावर हरदा शहराच्या बाहेरील मगरधा रोडवरील बैरागढमध्ये मंगळवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी 50 हून अधिक अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका गाड्या आहेत, तर डॉक्टरांची अनेक पथकेही रवाना करण्यात आली आहेत. या घटनेनंतर हरदामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोणतीही दहशत निर्माण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा कारखाना अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत सुमारे दीडशे लोक या कारखान्यात काम करत होते.