संसदेचे चालू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन एक दिवसाने वाढवण्यात आले आहे. आधी हे अधिवेशन 9 फेब्रुवारी रोजी संपणार होते पण आता ते 10 फेब्रुवारीपर्यंत एक दिवसाने वाढवण्यात आले आहे.
या वर्षी एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे अधिवेशन 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू केले होते. तसेच ते 9 फेब्रुवारी रोजी संपणार होते. पण आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एका दिवसाने वाढवण्यात आले आहे.
कनिष्ठ सभागृहात मुदतवाढीची घोषणा करताना, सभापती ओम बिर्ला म्हणाले, “माननीय सदस्य, माननीय संसदीय कामकाज मंत्री यांनी 17 व्या लोकसभेचे 15 वे अधिवेशन शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच राज्यसभेत सभापती जगदीप धनखर यांनीही अधिवेशन एक दिवसासाठी वाढवले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते की, केंद्र सरकार 2014 पूर्वी आणि नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना करणारी श्वेतपत्रिका जारी करेल.
संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने त्या वर्षांच्या संकटावर मात केली आहे आणि अर्थव्यवस्था उच्च शाश्वत विकासाच्या मार्गावर दृढपणे ठेवली आहे.
“जेव्हा आमच्या सरकारने 2014 मध्ये सत्ता हाती घेतली, तेव्हा टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याची आणि प्रशासन व्यवस्था सुव्यवस्थित करण्याची जबाबदारी मोठी होती. लोकांना आशा देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि अत्यंत आवश्यकतेसाठी समर्थन निर्माण करणे ही काळाची गरज होती.’राष्ट्र-प्रथम’ या आमच्या दृढ विश्वासाचे पालन करत सरकारने हे यशस्वीरित्या केले आहे,” असेही त्या म्हणाल्या.
पुढे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले की, “त्या वर्षांच्या गैरकारभारातून धडा घेण्याच्या एकमेव उद्देशाने 2014 पर्यंत आपण कुठे होतो आणि आता कुठे आहोत हे पाहण्यासाठी सरकार सभागृहात श्वेतपत्रिका सादर करेल”.
“प्रशासन, विकास आणि कार्यप्रदर्शन, प्रभावी वितरण आणि ‘जनकल्याण’ या अनुकरणीय ट्रॅक रेकॉर्डने सरकारला विश्वास, आणि जनतेचा आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे काहीही झाले तरी चांगल्या हेतूने ‘विकसित भारत’चे ध्येय साध्य करण्यासाठी येत्या काही वर्षांत आणि दशकांमध्ये खरे समर्पण आणि कठोर परिश्रम करायचे आहेत”, असेही त्या म्हणाल्या.