महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देत त्यांचे पक्षाशी 55 वर्षांपासून असलेले नाते संपुष्टात आणले होते. तसेच ते पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. अशातच आता काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसला आहे. आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर आज त्यांनी राजीनामा दिला असून याबाबतची एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
बाबा सिद्दीकी यांनी राजीनाम्याबाबतचे एक ट्विट केले आहे. “काँग्रेस पक्षात मी तरूणपणात सामील झालो आणि हा माझा 48 वर्षांचा प्रवास महत्त्वाचा आहे. मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला व्यक्त व्हायला खूप काही आवडले असते पण असे म्हणतात ना की काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या…तसेच या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतेो”, असे ट्विट सिद्दीकी यांनी केले आहे.
बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होते. ते 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. तर 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले होते. तसेच सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.