काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे एक पत्र वाचत काँग्रेसवर टीका केली होती. अशातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत मोठा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी हे ओबीसी म्हणून जन्माले आलेले नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी ओबीसी म्हणून जन्माला आलेले नाहीत, ते सर्वसामान्य जातीतील आहेत, असे राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले आहे. तर त्यांनी केलेल्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, काल (7 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. त्यांनी आरक्षणाबाबतचे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक पत्र वाचून दाखवले. तसेच काँग्रेस पक्ष आरक्षणाच्या जन्मजात विरोधात आहे, असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जातीबद्दल काँग्रेस बऱ्याच गोष्टी बोलत आहे. जर त्यांना जातीबाबत बोलायचे असले तर त्यांनी आधी स्वत:कडे एकदा पाहावे, मग त्यांनी स्वत: काय केले आहे ते त्यांना कळेल. काँग्रेस दलित, आदिवासी आणि मागास यांच्या जन्मजात विरोधात आहे. कधी कधी मला वाटते की, जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर एससी, एसटींना आरक्षण मिळाले असते की नसते? असा प्रश्न मला पडत असतो. काँग्रेसचे विचार आत्ताचे नसून खूप आधीपासूनचे आहेत. माझ्याकडे त्याचा पुरावा देखील आहे.
एकदा पंडित नेहरूंनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्या पत्राचा मी अनुवाद वाचत आहे. “कुठल्याही प्रकारचे आरक्षण मला पसंत नाही. विशेषत: नोकऱ्यांमधील आरक्षण तर कधीच पसंत नाही. मी अशा निर्णयाच्या विरोधात आहे जो अकुशलतेच्या वाढीस चालना देईल आणि जो दुय्यम दर्जाकडे घेऊन जाईल”, हे नेहरूंनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र आहे. त्यामुळे काँग्रेस जन्मजात आरक्षणाच्या विरोधात आहे असे मला वाटते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले की, पंडित नेहरू म्हणत असत की, ओबीसी, एससी, एसटी यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले तर कामाचा स्तर हा खाली जाईल. तसेच नेहरूंनी जे सांगितले आहे ते काँग्रेससाठी काळ्या दगडावरील रेघ असते. त्यामुळे तुम्ही दाखवण्यासाठी काहीही म्हणालात तरी तुमचे विचार अशा अनेक उदाहरणांनी सिद्ध होतात, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.