देशात यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपा सरकारने अब की बार ४०० पार ची घोषणा केली आहे. तर, सर्व विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन करून मोदी सरकारला कसे पराभूत करता येईल याची तयारी करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी ‘इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोल’ नुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकेल असे चित्र दिसत आहे. यंदा भाजपा ८० पैकी ७० जागा जिंकण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये भाजपाने ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला एकूण मतांपैकी ५२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. द मूड ऑफ नेशनच्या फेब्रुवारी २०२४ चा सर्व्हे सर्व लोकसभा जागांवर ३५,८०१ प्रतिसादकर्त्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. हे सर्वेक्षण १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत घेण्यात आले आहे. सूचना – हे ओपिनियन पोल कदाचित चुकीचे देखील ठरू शकतात.
दरम्यान, सत्ताधारी भाजपा पुन्हा सत्तेत येऊ नये यासाठी देशातील विरोधक एकत्रित आले आहेत. यासाठी त्यांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. मात्र त्यातील काही पक्षांनी आपण स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुळात आधी ‘इंडिया’ आघाडीचे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरेल. तर दुसरीकडे भाजपा म्हणजेच एनडीएमने आम्हाला तिसऱ्यांदा बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर अब की पार ४०० पार अशी घोषणा देखील देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी भाजपाला ३७० पेक्षा अधिक तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात जास्त जागा या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून येतात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांचे या दोन राज्यांवर विशेष लक्ष असणार हे काही वेगळे सांगायला नको.