पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होत आहे. देशातील नवीन सरकार निवडण्यासाठी 12.85 कोटी मतदार मतदान करत आहेत, मात्र मतदान सुरू होताच सरकारने मोबाईल सेवा आणि इंटरनेट बंद केली आहे.
पाकिस्तानातील इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच एसएमएस सेवाही बंद करण्यात आली असून इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांच्या पक्षांनी सरकारच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे. मात्र, मतदानाच्या पार्श्वभूमीवर वातावरण बिघडू नये, यासाठी इंटरनेट बंदी घालण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे माजी खासदार मुस्तफा नवाज खोकर यांनी म्हटले आहे की, इंटरनेटवर बंदी घालण्यामागचा हेतू निवडणुकीत हेराफेरी करण्याचा होता. पाकिस्तानातील वातावरण आधीच खराब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
देश आर्थिक संकट आणि गरिबीशी झुंजत असताना सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तसेच मतदानापूर्वीच वातावरण बिघडले आहे. मतदानाच्या दिवशी इंटरनेटवर बंदी घालून निवडणूक उमेदवारांना त्यांच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इम्रान खान यांनी मोबाईल सेवा आणि इंटरनेट बंदी यावर प्रश्न उपस्थित केले आणि म्हणाले की, मतदान सुरु होताच मोबाईल आणि इंटरनेट बंद करण्यात आले हे अत्यंत लज्जास्पद आहे. हा देशाचा विश्वासघात आहे. काळजीवाहू सरकारने लष्कराच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे. मोबाईल-इंटरनेट बंद करणे म्हणजे नागरिकांच्या हक्कांचे दडपशाही आणि लोकशाही प्रक्रियेची थट्टा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये एकूण 336 जागा आहेत, मात्र 266 जागांसाठी थेट निवडणुका होत आहेत. राष्ट्रीय विधानसभेसाठी 5121 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत तर 4 राज्यांच्या विधानसभांसाठी 12695 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये 4807 पुरुष आणि 570 महिला उमेदवार आहेत. यात 2 ट्रान्सजेंडर उमेदवारही आहेत. 70 जागा राखीव आहेत, त्यापैकी 60 जागा महिलांसाठी आणि 10 जागा बिगर मुस्लिमांसाठी राखीव आहेत.
नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन), इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे.