लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अशातच आता ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.
येत्या 21 आणि 22 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते उमेदवारपदी नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा करू शकतात.
दरम्यान, नरेंद्र खेडेकर हे याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख होते. तसेच सध्या ते बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. तर आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांनी खेडेकर यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे उभे राहतील.