काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेचे नेतृत्व करत आहेत. अनेक राज्यांमधून फिरून ही भारत जोडो न्याय यात्रा ओडिशा राज्यात पोहोचली आहे. ओडिशामधील झारसुगुडा येथे बोलताना राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या जातीबद्दल खोटे बोलत असल्याचा आरोप केला. त्यावर आता भाजपाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म ओबीसी प्रवर्गात झालेला नाही. तर त्यांचा जन्म गुजरातमधील तेली जातीत झाला. २००० साली भाजपने समाजाला ओबीसी हा टॅग दिला. त्यांचा जन्म सर्वसामान्य जातीत झाला.” यावर आता भाजपाने देखील राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, ”ही राहुल गांधींची पातळी आहे का? आपल्या देशातील गरीब लोकं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्ग नरेंद्र मोदींना आपला नेता मानतात. काँग्रेस पक्षाचे भविष्य अंधारात आहे. राहुल गांधींनी ही लज्जास्पद आणि निराधार विधाने करणे थांबवावे.
भाजपाने राहून गांधी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जात गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी दोन वर्ष आधी ओबीसी म्हणून अधिसूचित करण्यात आली आहे. भाजपाचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर राहुल गांधींच्या विधानाचा हवाला देत सांगितले, ”हे उघड खोटे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जात २७ ऑक्टोबर, १९९९ रोजी ओबीसी म्हणून अधिसूचित करण्यात आली होती. गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या दोन वर्षांपूर्वी. गुजरातचे मुख्यमंत्री झाले. जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत संपूर्ण नेहरू-गांधी परिवार ओबीसींच्या विरोधात आहे.”