केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, गुरुवारी लोकसभेत यूपीए सरकारच्या कार्यकाळावर श्वेतपत्रिका सादर केली. या श्वेतपत्रिकेत सरकारने 2014 पूर्वी आणि नंतरचा भारत आणि त्याची अर्थव्यवस्था यांच्यातील फरक तपशीलवार स्पष्ट केले आहेत.
केंद्र सरकारने आपल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे की, यूपीएने 10 वर्षांत अर्थव्यवस्था खराब केली होती. या श्वेतपत्रिकेवर उद्या, शुक्रवारी आणि संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत शनिवारी चर्चा होणार आहे. श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 2024 पूर्वी देशासमोर असलेली आर्थिक आव्हाने आणि 2014 नंतर एनडीए सरकारने या आव्हानांना कसे तोंड दिले आणि समस्यांवर मात केली यावर प्रकाश टाकण्यात आलाय. एकूण 69 पानांची ही श्वेतपत्रिका 3 भागात विभागली आहे. यामध्ये 2004 ते 2014 या काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारला ‘यूपीए- सरकार’ आणि 2014 ते 2024 या कालखंडातील एनडीए सरकारसाठी ‘आमचे सरकार’ असा शब्दप्रयोग करण्यात आलाय.
केंद्र सरकार यूपीए सरकारच्या कार्यकाळावर श्वेतपत्रिका आणणार असल्याचे जयंत सिन्हा यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले होते. त्यामुळे ही श्वेतपत्रिका येण्यापूर्वीच काँग्रेसने गेल्या 10 वर्षातील एनडीएच्या कार्यकाळावर कृष्णपत्र (ब्लॅक-पेपर) जारी केलेय. काँग्रेसने आपल्या ब्लॅक-पेपरला “10 वर्षे, अन्यायाचा काळ” असे नाव दिले आहे. खरगे म्हणाले की, भाजपने 10 वर्षात 411 विरोधी आमदारांना पक्षात आणले. भाजपने लोकशाही नष्ट केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या या ब्लॅक पेपरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज्यसभेतील मावळत्या सदस्यांना निरोप देताना पंतप्रधानांना काँग्रेसच्या ब्लॅक पेपरला काळा टिळा म्हंटले. एनडीए सरकारच्या कामगिरीला कुणाची नजर लागू नये म्हणून काँग्रेसने हा ब्लॅक पेपर जारी केल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला.