उत्तराखंड येथील हल्दवानी शहरात गुरुवारीअवैधरित्या बांधण्यात आलेले मशिद आणि मदरसे तोडल्यानंतर हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुलडोझर कारवाई करण्यात आल्याने पोलिस प्रशासनावर जोरदार दगडफेक करण्यात आली. तसेच यावेळी अनेक वाहने देखील पेटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर दुपारी दीड-दोन वाजता एसडीएम आणि महापालिका अधिकारी यांच्यासह पोलिसांचे पथक बेकायदेशीर मदरसे जमीनदोस्त करण्यासाठी गेले होते मात्र अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवल्यानंतर लगेचच काही लोकांनी दगडफेक सुरू केली. पोलिसांनी जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र दंगलखोरांनी बांभूळपुरा पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेरले आणि दगडफेक केली. दंगलखोरांनी मदरसा पाडण्यासाठी वापरलेल्या बुलडोझरचीही तोडफोड केली.अनेक वाहने जाळली. ट्रान्सफॉर्मरलाही आग लागली, त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. . या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 300 च्य आसपास जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमींमध्ये पोलीस, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समाजकंटकांनी 7 पेक्षा अधिक मीडियाच्या गाड्या पेटवून दिल्याचे वृत्तही समोर आले आहे.
समाजकंटकांनी पोलीस स्टेशन बाहेर उभी असलेली पोलिसांची वाहन आणि बाइक पेटवून दिल्या. 20 पेक्षा जास्त बाइक जाळल्या. पोलीस स्टेशनच्या आत आणि बाहेर तोडफोड केली. पोलीस अधीक्षक हरीश चंद्र वर्मासह 40 जवान पोलीस स्टेशनच्या आत अडकले होते. यात बहुतांश महिला पोलीस होत्या.
डीएम वंदना सिंह यांनी वनभुलपुरामध्ये कर्फ्यू लागू केला असून दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज (9 फेब्रुवारी) रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली असून हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाच्या 4 कंपन्या आणि PAC च्या 2 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्कर धामी देखील या संपूर्ण प्रकरणावर अधिकाऱ्यांकडून क्षणोक्षणी अपडेट्स घेत आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले आहेत की, न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्यात आले होते. आता या हिंसाचारानंतर हल्ला आणि जाळपोळ करणाऱ्यांची ओळख पटवून कठोर कारवाई केली जाईल.