देशामध्ये यंदा लोकसभा निवडणूक होणार आहे. साधारणतः मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तसेच एप्रिल मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. तिसऱ्यांदा सरकार येणार असे एनडीए म्हणजेच मोदी सरकारचे म्हणणे आहे. तर पुन्हा केंद्रात मोदी, भाजपाचे सरकार एकत्रित येऊ नये म्हणून देशातील सर्व विरोधक मोठे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. यासाठी त्यांनी ‘इंडिया’ आघाडीची देखील स्थापना केली आहे. त्यातच आता एक सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा देशात भाजपा सत्ता स्थापन करणार असे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीआधी ‘इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोल’ नुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा अंदाज आहे. मात्र २०२४ मध्ये ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठताना दिसत नाहीये.
MOTN पोलनुसार, जर का जा देशात लोकसभा निवडणूक झाली तर, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए ३३५ जागा जिंकेल. म्हणजेच एनडीए २७२ जागांचा बहुमताचा एकदा आरामात पार करताना दिसत आहे. द मूड ऑफ द नेशन हा सर्व्हे १५ डिसेंबर ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत घेण्यात आला. हा सर्व्हे सगळ्या लोकसभा जागांसाठी करण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी ओपिनियन पोल खरे ठरतीलच असे नाही ते चुकीचे सुद्धा असू शकतात.
‘इंडिया’ आघाडीतील घटक ज्यामध्ये काँग्रेस पक्ष देखील आहे. इंडिया आघाडीला १६६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र एनडीएच्या बालेकिल्ल्यांमध्ये त्यांना मोठे आव्हान उभे करणे अवघड जाऊ शकते. पक्षनिहाय जागावाटपाच्या बाबतीत भाजपाला ५४३ पैकी ३०४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये एनडीएने ३०३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्ष ७१ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीमध्ये अनेक पक्ष सामील होत आहेत. मात्र अनेक पक्ष स्वबळावरच लढणार असल्याचे सांगत आहेत. तसेच या आघाडीकडे अजून पंतप्रधान पदाचा चेहरा देखील ठरवण्यात आला नसल्याने, याचा फटका लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला बसण्याची शक्यता आहे. तसेच २०२४ मध्ये काहीही करून भाजपाला पराभूत करायचे यासाठी विरोधक जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र आताच हा सर्व्हेचा आधार घेतल्यास त्यांच्या प्रयत्नांना फार यश मिळू शकेल असे चित्र दिसून येत नाही.