पाकिस्तानमध्ये हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद लाहोर NA 122 मधून निवडणूक हरला आहे. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे समर्थक अपक्ष उमेदवार लतीफ खोसा यांनी सईदचा 1 लाखाहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तल्हा सईदला केवळ 2024 मते मिळाली आहेत, तर विजयी झालेल्या लतीफ खोसा यांना 117109 मते मिळाली आहेत.
नवाझ शरीफ यांचे पीएमएल-एनचे उमेदवार साद रफिक 77,907 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तसेच आता हाफिज सईदचे दहशतवादी मनसुबे उधळून लावले आहेत. आपल्या दहशतवादी मुलाला पाकिस्तानच्या राजकारणात प्रस्थापित करण्याचा हाफिजचा प्रयत्न होता. त्यासाठी हाफिजच्या सांगण्यावरून लष्कर-ए-तैयबाने नवा राजकीय पक्षही स्थापन केला होता.
दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद हा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेतील नंबर दोनचा दहशतवादी असल्याचे बोलले जात आहे. हाफिज सईदनंतर तल्हा सईद हा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारताने तल्हा सईदला यापूर्वीच दहशतवादी घोषित केले आहे. त्याचे वडील हाफिज सईदप्रमाणेच तल्हा सईदही अनेक दहशतवादी कट रचण्यात सहभागी आहे. तसेच तल्हा सईदवर अनेकवेळा हल्ले झाले पण तो अनेकदा बचावला.