अजित पवार हे बऱ्याचदा राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला आणि सत्तेत आलो असे सांगतात. तर त्यांच्या या वक्तव्यावर आज शरद पवार यांनी भाष्य करत खोचक शब्दांत टीका केली आहे. विकासासाठी पक्ष सोडला असे म्हणणे चूकीचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.
अजित पवारांवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, काही लोक हे राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असे सांगत आहेत. पण हा दावा अजिबात खरा नाही. तपास यंत्रणांकडून काही नेत्यांची चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यानंतर बंद झाली. त्यामुळे लोकांनी विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूकीचे आहे.
तुम्ही कष्ट करा आणि जागृत राहा. तरच महाराष्ट्र तुमच्यासोबत राहील. तसेच जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
आज देशात भाजपच्या विचाराच्या विरोधात कोणीही भूमिका घेतली की त्याच्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्रात ED हा शब्द कोणालाही माहिती नव्हता. पण मागील काही वर्षांमध्ये ED हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे. या काळामध्ये ईडीचा गैरवापर झाला आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली.