मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात कतारच्या एका कोर्टाने अल दहरा ग्लोबल प्रकरणात अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची मृत्युदंडाची शिक्षा बदलण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर भारतीय नौदलाचे माजी कर्मचारी दाखल झाले. विमानतळावर येताच या कर्मचाऱ्यांनी ”भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या. हे नौदलाचे माजी कर्मचारी अनेक महिने कतारच्या तुरुंगांत होते. तसेच त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी नरेंद्र मोदींनी वैयक्तिक हस्तक्षेप केल्याबद्दल कौतुक देखील केले.
परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सकाळी कतारमध्ये ताब्यात घेतलेल्या भारतीय नागरिकांची सुटकेची घोषणा केली. ”कतारमध्ये अटकेत असलेल्या दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. या आठपैकी सात जण भारतात परतले आहेत. कतार राज्याच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो”, असे निवेदनात म्हटले आहे.
ऑगस्ट २०२२ मध्ये कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, २८ डिसेंबर २०२३ रोजी कतारच्या न्यायालयाने नौदलाच्या माजी कर्मचाऱ्यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली. भारतीय नौदलाचे माजी कर्मचारी दिल्ली पोहोचताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आमची सुटका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले नसते तर आमची सुटका झाली नसती असे, ते कमर्चारी म्हणाले.